LOGO
Home जाणून घ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी हे दहा महत्त्वाचे मुद्दे ?
Finance

जाणून घ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी हे दहा महत्त्वाचे मुद्दे ?

- 2023-06-16
जाणून घ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी हे दहा महत्त्वाचे मुद्दे ?


               

 

आताच्या काळातली बरीचशी सुशिक्षित पिढी ही गुंतवणूकी कडे वळताना दिसते, कमी भांडवलात गुंतवणूक करता येत असल्यामुळे सोने गुंतवणूक, रियल इस्टेट यापेक्षाही जास्त पसंती सध्या शेअर बाजारातील गुंतवणुकीला आहे.

आपण केलेली गुंतवणूक ही खरच भविष्यात फायदा देणारी आहे का ? आपण केलेल्या गुंतवणुकीवर भविष्यात अपेक्षित मोबदला मिळेल का ? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, शेअर्सचे कशा पद्धतीने विश्लेषण करावे हे आपण जाणून घेऊयात.

              

 

१. बाजारातील चढ-उतार : शेअरच्या मागणी व पुरवठ्यानुसार शेअरच्या किंमतींमध्ये रोज चढ-उतार होत असतात. शेअर्सची मागणी कमी होऊन पुरवठ्यात वाढ झाली की शेअर्सचे बाजार भाव कोसळतात यातील संधी ओळखून कमीत-कमी किमतीत टप्प्याटप्प्याने शेअरची खरेदी करावी.

 

२. परराष्ट्रीय धोरण : भारताचे व कुठल्याही देशाचे परराष्ट्रीय धोरण हे काळानुरूप बदलत असते. आपलं परराष्ट्रीय धोरण काय व त्याचे आपण घेतलेल्या शेअर वरती काय परिणाम होतील याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.

 

३. कंपनीचे मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis): कंपनीचा वार्षिक अहवाल, प्रतिस्पर्धी, कंपनीचा मागील पाच वर्षांचा अहवाल, कंपनीची उत्पादने यांसारख्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास मूलभूत विश्लेषण करताना करणे गरजेचे आहे. याबरोबरच अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती, व्याजदर, उत्पादन, कमाई, रोजगार, जीडीपी, उत्पादन आणि व्यवस्थापन या घटकांचाही विचार केला जातो.

 

४ कंपनीचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis): शेअरच्या मूलभूत विश्लेषणाबरोबरच त्याचे तांत्रिक विश्लेषण करणे फार गरजेचे आहे यामुळे आपण घेत असलेला शेअर्स हा योग्य किमतीत आहे की नाही हे ठरवण्यास मदत होते. तांत्रिक विश्लेषण करताना शेअर्सचा आलेख(chart)  बघून त्याचा अचूक कल (Trend) ठरवणे सोपे जाते.

 

५. कंपनीसाठीच्या भविष्यातील संधी: साधारणता कुठल्याही कंपनीच्या शेअरच्या किमती या कंपनी सध्या व भविष्यात कशाप्रकारे काम करणार आहे यावर ठरत असते. कंपनीच्या सध्याच्या परिस्थितीबरोबरच भविष्यातील परिस्थितीचा अंदाज बांधून केलेली गुंतवणूक कधीही फायद्याची ठरते.


६. कंपनीचे डिव्हीडंड धोरण: शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बहुतेक कंपन्या आपल्या नफ्यातील काही भाग हा दरवर्षी आपल्या भागधारकांना देत असतात यालाच डिव्हीडंड असे म्हणतात. कंपन्यामार्फत दिला जाणारा डीव्हीडंड हा दरवर्षी सारखा असेलचं असे नाही, कंपनीचा सध्याचा नफा व भविष्यातील योजना या सर्वांचा विचार करून डिव्हीडंड दिला जातो. आपल्या पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स हे जास्तीत जास्त डिव्हिडंड देणारे असावेत त्यामुळे शेअर बाजारातील मंदीच्या काळात मिळणाऱ्या डिव्हीडंड मुळे आपल्याला मदत होईल.

 

७. वैविध्यपूर्ण (Diversified) पोर्टफोलिओ : आपण केलेली गुंतवणूक ही एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न करता ती विविध क्षेत्रांमध्ये असावी जसे की वाहन क्षेत्र, आयटी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग क्षेत्र इ. आपण केलेल्या विविध क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे कठीण काळातही आपला पोर्टफोलिओ स्थिर राहण्यास मदत होते.

 

८. शेअर मधील वाढ नैसर्गिक की अनैसर्गिक: ठराविक शेअरची किंमत  वाढत आहे हे बघून बरेच जण त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्साही होतात, काही नफेखोरी करणाऱ्या लोकांमुळे शेअरच्या किमती या अनैसर्गिकपणे वाढल्या जातात व ठराविक काळानंतर अचानकपणे त्या कोसळतात यामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रचंड नुकसान होते हे टाळण्यासाठी शेअर्सचे मूलभूत व तांत्रिक विश्लेषण (Fundamental and Technical Analysis) करणे गरजेचे आहे.

 

९. कंपनीचा इतिहास : कुठल्याही कंपनीच्या भविष्याला भूतकाळाचा आधार असतो म्हणूनच कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीच्या भूतपूर्व गोष्टींची पडताळणी करावी, जसे की कंपनीचा मागील पाच वर्षांचा अहवाल, भूतकाळात घेतलेले काही निर्णय व त्याचे कंपनीवर झालेले परिणाम, कंपनीचे यापूर्वीचे संचालक मंडळ व त्यांचे कामकाज.

 

१०. ब्रोकरची निवड: गुंतवणूक करताना खात्रीशीर शेअर बरोबरचं खात्रीशीर ब्रोकर निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या बऱ्याचश्या बँकाही ब्रोकिंगच्या सेवा पुरवत आहेत, बँकांच्या अंतर्गत असलेल्या ब्रोकिंग सर्विसमध्ये डिमॅट  अकाउंट उघडणे हे जास्त सुरक्षित मानले जाते.