LOGO
Home उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना
Finance

उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना

- 2023-06-25
उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना

शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून शिकून उच्च पदावर पोहोचलेली मुले अनेक क्षेत्रात दिसत आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाच्या सोयी गाव पातळीवर बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. मात्र त्या पुढील महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी शहरे किंवा परदेशामध्ये जावे लागते. या ठिकाणी होणारा खर्च अनेक सामान्य कुटुंबाला परवडत नाही. या खर्चाच्या भीतीपोटी अनेक हुशार मुलांचेही शिक्षण अडखळते. खरे तर हुशार, होतकरू मुलांना बँकेतून शैक्षणिक कर्ज उपलब्ध होऊ शकते त्याचे अनेकांना माहितीच नसते. शैक्षणिक कर्जा संदर्भात पालकांच्या मनात अनेक शंका आहेत त्याचेच निरसन या लेखात करणार आहोत

बँकेत गेल्यावर कर्ज देण्यास टाळाटाळ करतात?

केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे कोणताही हुशार व होतकर विद्यार्थी आर्थिक पाठबळा अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याला बँकेकडून कर्ज स्वरूपात आर्थिक मदत व्हावी व त्याद्वारे त्याला उच्च शिक्षण घेता यावे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आपल्या पाल्यास मार्क्स चांगले असतील, उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला असेल तर त्याला कर्ज नाकरता येत नाही. शिक्षण कर्ज मिळण्यासाठी पालकांकडे जमीन पाहिजे, घर पाहिजे, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे, अशा बाबींची गरज नाही. उलट त्यांच्याकडे हे सर्व नाही म्हणून शिक्षण कर्ज द्यावयाचे आहे. त्यामुळे पालकांकडे काहीही नाही, सर्वसामान्य परिस्थिती आहे, हे कारण कर्ज नामंजुरीस चालत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी एका साध्या कागदावर लिखित कर्ज मागणी अर्ज लिहून कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज बँकेत द्यावा. अर्ज मिळाल्याची पोहोच बँक अधिकाऱ्यांकडून घ्यावी. जर समोरासमोर असा अर्ज स्वीकारत नसतील, आणि पोहोच देत नसतील तर अर्ज पोस्टाने रजिस्टर पोहोच पावतीसह पाठवावा. बँकेला पंधरा दिवस ते जास्तीत जास्त एक महिना या कालावधीत कर्ज मंजूर करावे लागेल किंवा नामंजुरीचे कारण द्यावे लागेल. नामंजुरीचे कारण बँकेकडून लेखी घ्यावे.

कर्जासाठी लागणारे तारण व जामीनदार:

शिक्षण कर्ज योजनेत तारण व जामीनदार किती कर्ज रकमेच्यावर लागतात, हे स्पष्ट दिलेले आहे. या नियमांच्या बाहेर जाऊन बँकेला तारण व जामीनदार मागता येणार नाही. बँकेकडून याबाबत लेखी पत्र द्यायला हवे व आपण तशी मागणी करावी.

कर्ज मंजुरी पूर्वीच फी भरलेली असेल, तर अशावेळी काय करावे?

काही कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाची पूर्ण फी भरल्याशिवाय प्रवेश निश्चित होत नाही. अशावेळी पालकांना बाहेरून उसनवारी करून प्रवेश घ्यावा लागतो. कर्ज नंतर मंजूर होते. अशी पहिल्या वर्षाची भरलेल्या रकमेची बँकेकडे मागणी करावी. ती रक्कम बँक रोखीत परत देऊ शकते.

बँक किंवा सोसायटी यांची इतर कर्जे असतील, तर शिक्षण कर्ज मिळते का?

बँक किंवा सोसायटी यांची इतर कर्जे असतील तर शिक्षण कर्ज मिळण्यास काहीही अडचण नाही. दोन्ही कर्जांचा उद्देश वेगवेगळा असल्याने दुसरे कर्ज आहे म्हणून शिक्षण कर्जास अडवणूक करता येणार नाही. फक्त कुठेही थकबाकी असता कामा नये.

शिक्षण कर्जासाठी कोणत्या बँकेत भेटावे?

पालक ज्या ठिकाणी राहतात, तेथून जवळ असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत कर्जासाठी भेटावे.

कर्ज परतफेड करतांना:

मुलगा/मुलगी शिक्षण संपवून नोकरीला लागल्यावर त्यांचा पत्ता,फोन नंबर बँकेस कळवणे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे बाबत मुलांशी संपर्कात राहणे.

मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल तर तिचे लग्न ठरवताना कर्ज फेडी संदर्भात मुलगी व जावई यांच्याशी स्पष्ट बोलावे. कर्ज भरण्याची नैतिक व सह कर्जदार म्हणून जबाबदारी आपलीच असते.

कर्ज भरण्याची नैतिक जबाबदारी पालकांची आहे याची जाणीव ठेवून कर्ज वसुलीस बँकेस सहकार्य करणे.